महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , देवरी
ता. देवरी, जि. गोंदिया - 441901
गोंदिया जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या ईशान्य दिशेला असुन उत्तर-पूर्व बाजूला मध्य प्रदेश व छत्तीसगढ राज्याच्या सीमा आहेत. गोंदिया जिल्हा पूर्वी भंडारा जिल्ह्याचा एक भाग होता. भंडारा जिल्ह्यातून दिनांक: 1 मे, 1999 रोजी विभागणी होवून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली असून जिल्ह्याचे क्षेत्रफळ 5,431चो.कि.मी. असुन सन 2011 नुसार लोकसंख्या ही 13,22,560 असुन आदिवासी समुदायाची लोकसंख्या 2,14,253 इतकी असुन त्यांची टक्केवारी 16.20 आहे. गोंदिया जिल्ह्यात प्रामुख्याने गोंड, हलबी, कवर, परधान या अनुसूचित जमाती लोकांचे वास्तव्य आहे. भात, ज्वारी, तेलबिया, गहू व तूर ही मुख्य पिके आहेत. वैनगंगा ही मुख्य नदी आहे. जिल्ह्यात धान उत्पादन जास्त होत असल्यामुळे हा जिल्हा तांदुळ उत्पादक जिल्हा (राईस सिटी) म्हणून ओळखला जातो.
जिल्ह्यातील आदिवासी समुदायाची स्वत:ची पारंपारिक संस्कृती आहे. आदिवासी लोक "पर्सा पेन" या देवाची उपासना करतात. "रेला" हे नृत्य आदिवासी समुदायात लोकप्रिय नृत्य आहे. तसेच "ढोल नृत्य" हे सुध्दा लोकप्रिय नृत्य आहे. ते शुभ प्रसंगी आणि नविन पिके येतात तेव्हा रेला हे नृत्य करतात. जिल्ह्यात आदिवासींचे मुख्य उत्सव होळी, दशहरा आणि दिवाळी हे आहेत.
सन 1973 मध्ये स्वतंत्र आदिवासी कल्याण संचालनालयाची निर्मिती करण्यात आली. राज्य शासनाने आदिवासींसाठी एक स्वतंत्र जनजाती क्षेत्र उपयोजना 1975-76 मध्ये तयार केली. त्यानुसार गोंदिया जिल्ह्याकरिता देवरी येथे दिनांक :- 14 मे, 1977 ला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्र. 1089/प्र.क्र./799/का.-15 दिनांक : 15.01.1992 नुसार या कार्यालयाची पुर्नरचना करण्यात आली.
गोंदिया जिल्ह्यात देवरी येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कार्यरत आहे. जिल्ह्यातील 08 तालुक्यामधील सन 2011 जनगणनेनुसार एकुण लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचे प्रमाण खालीलप्रमाणे आहे.
अक्र. | तालुका | गावांची संख्या | एकूण लोकसंख्या | आदिवासी लोकसंख्या | आदिवासी लोकसंख्या टक्केवारी |
---|---|---|---|---|---|
1 | तिरोडा | 124 | 1,76,254 | 14,381 | 8.16 |
2 | गोरेगाव | 99 | 1,24,890 | 18,847 | 15.09 |
3 | गोंदिया | 152 | 421,650 | 34,152 | 8.10 |
4 | आमगाव | 83 | 1,30,657 | 9,831 | 7.52 |
5 | सालेकसा | 92 | 90,679 | 23,990 | 26.46 |
6 | सडक अर्जुनी | 108 | 1,15,594 | 23,973 | 20.74 |
7 | अर्जुनी मोरगाव | 159 | 1,48,265 | 33,201 | 22.39 |
8 | देवरी | 135 | 1,14,518 | 55,878 | 48.79 |
एकुण | 952 | 13,22,507 | 2,14,253 | 16.20 |
प्रकल्प कार्यालय, देवरी च्या अंतर्गत खालीलप्रमाणे शाळा व वसतीगृह कार्यरत आहेत.
अक्र. | विवरण | संख्या |
---|---|---|
1 | शासकिय आश्रमशाळा | 11 |
2 | शासकिय वसतीगृह | 19 |
3 | अनुदानित आश्रमशाळा | 23 |
4 | एकलव्य माध्यमिक निवासी शाळा | 01 |
आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी केंद्र व राज्य शासन मदतीने या कार्यालयाकडून विशेष केंद्रीय सहाय्य योजना, केंद्रवती अर्थसहाय्य योजना, आदिवासी उपयोजना, ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना, कन्यादान योजना, नाविण्यपूर्ण योजना, शबरी घरकुल योजना, सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती, भारत सरकार शिष्यवृत्ती तसेच परदेशी शिष्यवृत्ती अशा विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात.